AMODINI
Solo Exhibition of Artworks by artist Suhas Joshi. Curated by Indira Barve
अमोदिनी-सुहास जोशी
अवकाशाची उत्पत्ती सांगणारा बिंदू, द्विमितीय अवकाशात ऊर्जा उत्पन्न करणारी रेषा आणि या अलौकिक ऊर्जेला नजकातीने सामावणारी परिपूर्ण रचना. या त्रिगुणात्मक कलाशैलीचा अभूतपूर्व अनुभव देणारी ही प्रदर्शनी ‘अमोदिनी’. नाशिकस्थित प्रख्यात चित्रकार सौ. सुहास जोशी यांनी आपणा दर्शकांबरोबर केलेला हा दृश्य संवाद, भारतीय स्त्री आणि तिच्या दैनंदिन जीवनाची एक सौंदर्यपूर्ण मांडणी आपल्यासमोर उलगडतो. भारतीय कलेतील सौंदर्य शैलीवर (डेकोरेटिव्ह आर्ट) आधारित ही चित्रे विविध विषयांची मांडणी एका वैशिष्ठ्यपूर्ण अलंकारीक पद्धतीने करतात. सूक्ष्म तपशिलांसकट भावपुर्णतेने मांडलेला हा आकृतिबंध रंग, रेषा आणि आकार यांची रसबाहार मैफलच म्हणावी लागेल.
सौ. सुहास जोशी गेल्या साधारण चाळीस वर्षांपासून कलेची उपासना करत आहेत. स्वतःची वैशिष्ठपूर्ण शैली विकसित करून कलेचे बहुआयामी सादरीकरण करणारी ही एक संवेदनशील चित्रकार. कला शिक्षणातील त्यांची जडणघडण आणि बरोबर लाभलेले कलाशिक्षकांचे योगदान यांची अत्यंत नम्रतेने दखल घेणारी ही चित्रकार आज ‘अमोदिनीच्या’ निमित्ताने पुन्हा एकदा स्वतःला व्यक्त करू पाहते आहे. ‘अमोदिनी’ अनुभवताना भारतीय कलेतील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या षडांगांचा प्रभाव या चित्रांच्या मांडणीत जाणवतो. कलानिर्मिती ते कलास्वाद या संपूर्ण प्रक्रियेमध्ये साधारण पहिल्या शतकात अधोरेखित केली गेलेली विविध सहा अंगे (कलासुत्र) उलगडण्याचा एक यशस्वी प्रयत्न ‘अमोदिनीचे’ दर्शक अनुभवतील याची मला खात्री आहे.
रूपभेदः प्रमाणानि भावलावण्ययोजनम।
सादृश्यं वर्णिकाभंग इति चित्रं षडंगकम्।।
रूपभेद:
’रुप’ म्हणजे विषयाचा बाह्यकार किंवा पेहराव. हा जितका दृष्य तितकाच मानसिक आणि ‘भेद’ म्हणजे चित्रकार म्हणून विषयाच्या बहुविध रूपांचे असणारे ज्ञान. ‘अमोदिनी’ पाहत असताना या चित्रांचे विषय आणि त्यांची मांडणी ही फक्त चित्रकाराची ज्ञाननिर्मिती नसून अनुभवनिर्मिती आहे याची पदोपदी प्रचिती येते.
प्रमाण:
विषयाचे अचूक आकलन तेव्हाच होते जेव्हा विषयाच्या मांडणीत त्याचे प्रमाण, मोजमाप, अंतर आणि शरीरशास्त्र योग्यरित्या अंतर्भूत असतात. ‘अमोदिनीतील’ प्रत्येक स्त्री हे प्रमाण घेऊन जेव्हा पटलावर येते तेव्हा दर्शक त्या चित्रातल्या विषयाशी नकळत जोडला जातो.
भाव:
विषयाला जिवंत करण्याची, त्यात ऊर्जा आणण्याची कला म्हणजे भाव. ‘अमोदिनी’ अनुभवताना दर्शक जसा चित्राशी एकरूप होऊ लागतो तसं प्रत्येक चित्र दर्शकाला एका आनंददायी भावविश्वाची सफर घडवतं.
लावण्य योजना:
नियोजनपूर्वक आणि नजकातपूर्ण केलेली सौंदर्याची मांडणी म्हणजे लावण्य योजना. ‘अमोदिनीतील’ प्रत्यक स्त्री कार्यमग्न तर आहेच; पण त्याच बरोबर तिचा चेहरा, शरीराची ढब आणि तिचा पेहराव दर्शकासमोर एक लावण्यमूर्ती उभी करतो.
सदृश्यता:
सारखेपणा किंवा समानता, चित्रकारासाठी षडांगातील सर्वात आव्हानात्मक अंग म्हणजे सदृश्यता. एक दर्शक म्हणून ह्या चित्रांमध्ये चितारलेली प्रत्येक स्त्री विषयानुरूप जशी उलगडत जाते तशी दर्शकाच्या स्मृतिपटलावरील प्रतिमा त्याला हुबेहूब त्या चित्रात दिसायला लागते.
वर्णिकाभंग:
कुंचल्याचा नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करून चित्रकाराने केलेली विषयाची मांडणी म्हणजे वर्णिकाभंग. बिंदू, रेषा, आकार, नियंत्रित रंग आणि अक्षर आकाराच्या पुनर्वापरातून तयार केलेला पोत या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणजे या प्रदर्शनातील परिपूर्ण ‘अमोदिनी’.
अमोदिनी चित्रीत होत असतानाचा संपूर्ण प्रवास हा वैयक्तिकरित्या स्वतः सौ.सुहास जोशी आणि यांची आई दिवंगत श्री.सुमती बापट यांच्या आठवणींवर बेतलेला आहे. प्रत्येक चित्राच्या जडण घडणीत जितके चित्रकाराचे कौशल्य अंतर्भूत आहे तितकीच चित्रकाराची आध्यात्मिक बैठक अखंड नामस्मरण स्वरूपातून चित्रबध्द करण्यात आलेली आहे. खरोखरच ‘अमोदिनी’ चित्रप्रदर्शनी एक आनंदानुभूती आहे जिचा मार्ग प्रत्येक दर्शकाच्या स्त्री मनातून जातो.
~ हृषीकेश खेडकर
22.02.2024